कोलकाता : गोरखालँडच्या आंदोलनाला भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांची चिथावणी असल्याचा आरोप करतानाच, राज्याने विनंती केली नसतानाही केंद्र सरकारने लष्कर पाठविले आहे आणि केंद्र राज्यांच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप करीत आहे, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केंद्राला फटकारले. गोरखालँडचे नेते आम्हाला भाजपाचा पाठिंबा असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. दुसरीकडे भाजपा मात्र भूमिका घेताना दिसत नाही. भाजपाच्या छोट्या राज्यांबाबतचे धोरण पाहता, गोरखालँडच्या समर्थकांना भाजपाचा छुपा पाठिंबा असावा, असे सुरुवातीपासून सर्रास बोलले जात होते. बशीरहाट व बदुरिया येथील वातावरण बिघडविण्यास आणि तिथे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यास काही संघटना जबाबदार आहेत, असे सांगून, त्यांनी त्याबद्दलही नाव न घेता भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, दोन धार्मिक संघटनांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बशीरहाट व बदुरिया येथील दंगलींची न्यायालयीन चौकशी केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.सीमा सुरक्षेचे प्रभारी कोण आहे? केंद्र की राज्य? असा सवाल करून त्या म्हणाल्या की, राज्यात शांतताभंंग करणे हे भाजपाचे कटकारस्थान आहे. दंगलीच्या काळात खोटे चित्रण दाखवून वातावरण बिघडवू पाहणाऱ्या दोन राष्ट्रीय टीव्ही चॅनलच्या विरुद्ध कारवाई करणार आहोत. (वृत्तसंस्था)ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या की, मोदी सरकार आणि भाजपा येथे शांतताभंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीमेपलीकडून लोकांना राज्यात प्रवेश दिला जात असून, येथील सांघिक रचनाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. बशीरहाटमध्ये येत असलेल्या भाजपाच्या एका तीन सदस्यीय टीमला रोखण्यात आले आहे. परिस्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरणारी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.तीन खासदारांना अटकभाजपाच्या खासदारांचे शिष्टमंडळ आज बशीरहाट येथे भेटीसाठी निघाले असता, त्यांना अडविण्यात आले. शिष्टमंडळात भाजपाच्या खा. मीनाक्षी लेखी, ओम माथूर व सत्यपाल सिंग यांचा समावेश होता. त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तेथील लोकांना त्रस्त करण्याची काय गरज आहे? तृणमूलचे खासदारही तेथे गेले नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजपाराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या राज्य शाखेने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि राज्यातील गंभीर स्थितीसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. दंगलग्रस्त भागातील लोकांना भरपाई देण्याची मागणीही भाजपाने केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, हा ममता बॅनर्जी यांचा आरोपही घोष यांनी फेटाळून लावला.
ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले
By admin | Published: July 09, 2017 3:13 AM