कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. सुत्रांच्या माहितीनुसार, आजच्या दोन तासांच्या दोन तासांच्या बैठकीवरुन प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करणार असल्याचे समजते.
प्रशांत किशोर यांना निवडणुकांचे चाणक्य समजले जाते. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविला. यामागे प्रशांत किशोर यांचीच रणनीती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी सुद्धा प्रशांत किशोर यांची रणनीती यशस्वी ठरणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रशांत किशोर एक महिन्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाने 18 जागांवर विजय मिळविल्यामुळे ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. त्यामुळे राज्यात 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी आतापासून तयारीला लागल्या आहेत.
आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीतीने चंद्रबाबू नायडू यांना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला. प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे जगन मोहन रेड्डी यांच्या व्हायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात लोसभेसाठी 25 जागांवर आणि विधानसभेसाठी 175 पैकी 150 जागांवर विजय मिळविल्या.
दरम्यान, प्रशांत किशोर गेल्या वर्षीपासून राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांना जदयूने राष्ट्रीय उपाध्यक्ष बनविले होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जदयूने त्यांना काही काम दिले नाही. याआधी प्रशांत किशोर 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करत होते. यानंतर त्यांनी 2015 मध्ये नितीश कुमार यांना विजय मिळवून दिला होता.