कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळविलेल्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ बुधवारी घेतली.
निवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जण मरण पावले. भाजप व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आता मी स्वीकारली असून, कोरोना साथीला आळा घालण्यासाठी आता माझे सरकार तातडीने पावले उचलेल. या संसर्गाच्या स्थितीचा ममता बॅनर्जी यांनी एका बैठकीत आढावाही घेतला. (वृत्तसंस्था)
मी रस्त्यावर उतरून लढा देणारी कार्यकर्ती आहे. मी लोकांचे मनोबल वाढविणार आहे. त्यामुळे भाजपशी प्रखर लढा देता येईल. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने हिंसाचार करू नये. कोरोना नियंत्रणात आणण्यास सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.- ममत बॅनर्जी, मुख्यमंत्री
कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात ठेवा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राखणे हे महत्त्वाचे आहे, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी दिला आहे.