पाटणा - सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या भेटीगाठीही सुरू आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिहारमध्ये जाऊन माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची भेट घेतली. यावेळी, लालू प्रसाद यादव यांना ममत बॅनर्जी यांनी वाकून नमस्कार केला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ममत बॅनर्जी म्हणाल्या की, लालूजी आणखीन सशक्त आहेत, ते भाजपसोबत लढू शकतात.
किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशननंतर लालू प्रसाद यादव भारतात आले. त्यानंतर, महाआघाडीच्या बैठकीत बोलताना त्यांचा राजकीय आक्रमकपणा पुन्हा दिसून आला. त्यामुळेच, पुन्हा बिहारमधून देशाच्या राजकारणाची घडी बसणार असल्याची चर्चाही सुरू झाली. उद्या म्हणजेच २३ जून रोजी विरोधी पक्षांची बैठक होत असून ममता बॅनर्जी त्यासाठीच पाटणा येथे आल्या आहेत. यावेळी, लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर ममता दीदींनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले. तसेच, त्यांच्यातील जज्बा पाहून मुक्तपणे प्रशंसा केली.
राजद सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. विपक्ष एकता बैठकीनंतर जे निश्चित होईल तेच आम्ही करू, असे ममता यांनी म्हटलं. तसेच, बिहारचे नालंदा विद्यापीठ आणि येथील मिठाई मला सर्वात जास्त आवडते. मला बिहारला यायलाही आवडतं, मी लालू प्रसाद यादव यांचा खूप आदर करते. देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. ते खूप दिवस तुरुंगात राहिले, रुग्णालयात राहिले, त्यामुळे त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे वाटत होते. पण, आज त्यांना भेटल्यानंतर आनंद झाला, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आता, ते भाजपसोबत अनेक दिवस लढू शकतात, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.