मागच्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकून असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय वेळेनुसार आज पहाटे त्यांना घेऊन ड्रॅगन स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरलं. त्यानंतर आता सुनीता विल्यम्स यांना जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतातूनही विविध प्रमुख नेत्यांनी सुनिता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सुनीता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शुभेच्चा देताना ममता बॅनर्जींकडून झालेल्या एका चुकीमुळे सभागृहात हशा पिकला.
त्याचं झालं असं की, ममता बॅनर्जी यांनी सुनीता विल्यम्स यांचं सुखरूप पृथ्वीवर आल्याबद्दल अभिनंदन केलं. तसेच त्यांना भारतातर्फे सन्मानित करण्याची मागणी केली. मात्र भाषणादरम्यान, ममता बॅनर्जी यांनी चुकून सुनीता विल्यम्स यांचा उल्लेख सुनीता चावला असा केला. मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या या चुकीमुळे सभागृहात खसखस पिकली. सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांच्या नावांची ममता बॅनर्जी यांच्याकडून गडबड झाली आणि त्यांनी चुकून सुनिता विल्यम्स ऐवजी चावला असा उल्लेख केला. मात्र त्यांनी त्वरित आपली चूक सुधारली.
दरम्यान, सुनिता विल्यम्स यांचं कौतुक करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी विज्ञान विषयक खूप वाचन करते. अंतराळातून माघारी येणं हे खूप कठीण असंत, याची मला कल्पना आहे. विमान उडतं आणि त्यात काही दोष निर्माण झाल्यास ते खाली येतं हे आपण अनेकदा पाहिलंय. मात्र अंतराळातून माघारी येणं कठीण आहे. अशा परिस्थिती अपघात होण्याचीही शक्यता असते. कल्पना चावला यांच्यासोबत अशी दुर्घटना घडली होती. मात्र सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे परतले आहेत. त्यासाठी आम्ही भारत आणि संपूर्ण जगाकडून बचाव पथकाचे आभार मानतो.