कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार काश्मीरमधील जनतेचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त बुधवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ममता यांनी असं म्हटलं आहे. आम्ही भाजपासमोर झुकणार नाही. आपण सरकारविरोधात आवाज उठवतच राहणार. त्याबद्दल मला अटक करावी असे आव्हानही त्यांनी दिले.
ममता बॅनर्जी यांनी 'तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि नेत्यांना केंद्र सरकार घाबरवत आहेत. मात्र आम्ही कोणत्याही संस्थेला घाबरणार नाही. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यांना वाटले तर मलाही ते तुरुंगात टाकतील. मी तुरुंगात जाईल. स्वातंत्र्याची लढाई मी लढेल. मात्र, भाजपासमोर झुकणार नाही' असं म्हटलं आहे. तसेच 'सर्वपक्षीय बैठक झाली असती, तर आम्ही आमचे मत मांडले असते. फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला सध्या कोठे आहेत, हे आम्हाला माहिती नाही' असेही ममता यांनी सांगितलं आहे.