ममता बॅनर्जीच लागू देणार नाहीत भाजपला गळती? दीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:34 PM2021-06-09T15:34:38+5:302021-06-09T15:37:20+5:30
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या विचारात
कोलकाता: पश्चिम बंगालची सत्ता राखत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हॅटट्रिक केली. बंगाल जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यभर सभा घेतल्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. मात्र तरीही तृणमूलनं सत्ता राखली. त्यामुळे आता सर्व चक्रं उलटी फिरू लागली आहेत. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करू इच्छिणाऱ्या नेत्यांमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, शमिक भट्टाचार्य, राजीव बॅनर्जी, सोनाली गुहा, दिपेंदू विश्वास यांच्यासह अनेक नेते तृणमूलमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. भाजपचे तब्बल ३० हून अधिक आमदार तृणमूलमध्ये येऊ इच्छितात. विशेष म्हणजे निवडणुकीआधी जवळपास इतक्याच आमदारांनी तृणमूलची साथ सोडली होती. तृणमूलनं सत्ता राखल्यानं नेते घरवापसीच्या तयारीत असले, तरी पक्षाच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तरी या नेत्यांना पुन्हा पक्ष प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाहीत.
आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!
तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तृणमूलची पुन्हा सत्ता आल्यानंतर या नेत्यांना त्यांची चूक जाणवली आहे. पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करण्यापेक्षा स्वगृही परतण्याचा विचार या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र या घरवापसीसाठी ममता फारशा अनुकूल नाहीत. त्यामुळे उघड नाराजी व्यक्त केलेल्या नेत्यांना भाजपमध्येच राहावं लागू शकतं. तृणमूल सोडून गेलेल्या नेत्यांच्या घरवारसीचा निर्णय ममता बॅनर्जीच घेतील, अशी माहिती पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.
बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शन
न्यूज १८ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाही. यासाठी ममतांना कोणतीही घाई नाही. 'पक्ष अडचणीत असताना, संकटांचा सामना करत असताना साथ सोडून जाणाऱ्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पक्ष सोडून जाणाऱ्या अनेकांनी नेतृत्त्वाला ब्लॅकमेल केलं होतं. अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते,' अशी माहिती सुत्रांनी दिली.