कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेमुळे सध्या बंगालमधील समाजमन संतप्त झालं आहे. तसेच या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार आंदोलनही होत आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडूनही ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एवढ्या संवेदनशीन मुद्द्यावर मी आधी लिहिलेल्या पत्राला तुमच्याकडून उत्तर आलं नाही. मात्र भारत सरकारच्या महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांकडून एक उत्तर मिळालं आहे. मात्र त्यामधून मी आधीच्या पत्रात उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलेलं नाही. माझ्या मते असं औपचारिक उत्तर पाठवताना विषयाचं गांभीर्य विचारात घेतलं गेलं नाही, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या दुसऱ्या पत्रामधून ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. या पत्रात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बलात्कारासारख्या घटनांविरोधात कठोर केंद्रीय कायदे तयार करण्याबाबत विचार केला गेला पाहिजे. तसेच असे गुन्हे करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाण्याची तरतूद केली गेली पाहिजे. तसेच बलात्काराच्या खटल्यांची निश्चित वेळेमध्ये सुनावणी झाली पाहिजे. या मागण्यांबाबत तुमच्याकडून विचार होईल, अशी मला अपेक्षा आहे, असेही ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या.