कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात आढावा बैठक घेतली. राज्यातील सर्वात मोठे सरकारी हॉस्पीटल म्हणून या रुग्णालयाचा नावलौकीक आहे. या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा करत नर्स आमि डॉक्टर्संना मोठं गिफ्ट दिलंय. येथील कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून मोफत जागा देण्यात येईल, असे ममता यांनी जाहीर केले.
ममता बॅनर्जी सरकारने या गृहप्रकल्पासाठी 10 एकर जमीन अधिग्रहण करण्याच्या सूचना केल्या आहेत. या जमिनीवर डॉक्टर्स आणि नर्सेस यांना घरं बांधण्यात येतील. या जमिनीसाठी त्यांना एकही रुपया द्यावा लागणार नाही, मोफत ही जमीन दिली जाणार आहे. त्यासोबतच, कोलकाता येथे नर्स आणि डॉक्टर्स यांच्या सोयीसाठी एक सरकारी हॉस्टेल उभारण्यात येणार असल्याचेही ममता यांनी सांगितले. महानगरातील ली रोडमध्ये हे 10 मजल्यांचे हॉस्टेल बांधण्यात येणार आहे. दरम्यान, बंगालमध्ये गुरुवारी गेल्या 24 तासांत 717 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
पोटनिवडणूक घेण्याची मागणी
पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी खुर्चीची चिंता अद्यापही कायम आहे. ममता पुढील 71 दिवसांत आमदार झाल्या नाही, तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाऊन राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत विधानसभा सदस्य होणे आवश्यक आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळविले आहे. मात्र, त्या स्वतः नंदीग्राम सीटवर भाजप नेते आणि त्यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या.
काय आहे नियम
नियमा प्रमाणे, जी व्यक्ती विधानसभा किंवा विधान परिषदेची (ज्या राज्यांत विधान परिषद आहे अशा राज्यांत) सदस्य नाही, तिला मुख्यमंत्री अथवा मंत्री बनविले जाऊ शकते. मात्र, अशा व्यक्तीला सहा महिन्यांच्या आत निवडून येणे आवश्यक आहे.