नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे विविध राज्यांतील कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय राज्यांच्या अधिकारांवर अन्याय करणारा असून, तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मध्यंतरी केंद्र सरकारने सीमेवरील राज्यांतील सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला होता. कायदा व सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी आहे. आतील क्षेत्र वाढवल्याने पोलिसांच्या म्हणजेच पर्यायाने राज्यांच्या अधिकारांवर गदा आल्याचे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना सांगितले. त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. तृणमूल काँग्रेसच्या सायली घोष यांनाही त्रिपुरा सरकारने अटक केल्याबद्दल ममता यांनी नाराजीही व्यक्त केली.
पवार व ठाकरे यांनाही भेटणारममता बॅनर्जी म्हणाल्या की, आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहोत. ममता बॅनर्जी मध्यंतरी गोव्यात गेल्या होत्या. दोन दिवस दिल्लीत होत्या. आता त्या विविध राज्यांत जाणार असून, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी तेथील विरोधी नेत्यांना भेटणार आहेत. पवार व ठाकरे यांना त्या त्याच संदर्भात भेटणार असल्याचे सांगण्यात आले.