पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी भाजपने बुधवारी (28 फेब्रुवारी 2024) बंगाल बंद केला होता. दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि गोळीबाराच्या बातम्याही आल्या होत्या. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, लक्षात ठेवा, जर बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही जळतील, असे विधान केले होते.
प्रक्षोभक वक्तव्य - यानंतर, एका वकिलाने मुख्यमंत्री ममतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांनी, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रक्षोभक होते आणि त्यांनी अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले, असा आरोप केला आहे.
वकील विनीत जिंदल यांनी म्हटले आहे, "ममता यांचे विधान प्रक्षोभक होते. यामुळे द्वेष आणि शत्रुत्व वाढेल. त्यांचे विधान सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे होते. कारण त्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्यांचा प्रभाव पडतो, जो धोकादायक ठरू शकतो."
जिंदल यांनी म्हटले आहे, "ममता बॅनर्जी यांनी आपल्या विधानात दिल्लीचा उल्लेख अशा राज्यांसोबत केला, ज्यांना त्यांनी इशारा दिला. मी दिल्लीचा नागरिक असल्याच्या नात्याने बंगालच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बीएनएसच्या कलम 152, 192, 196 आणि 353 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. अत्यंत गंभीर गुन्हा आहे."
काय म्हणाल्या होत्या ममता? -बंगाल बंदसंदर्भात बोलताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काही लोकांना वाटत आहे की, हा बांगलादेश आहे... मला बांगलादेश आवडतो, तेथील लोकही आमच्यासारखेच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. पण लक्षात ठेवा बांगलादेश एक वेगळा देश आहे आणि भारत एक वेगळा देश आहे. मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही... आपली खुर्चीही हालेल."