नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरुन संवाद साधण्याचे टाळल्याचे वृत्त होते. त्यानंतर, आता नवीन माहिती पुढे आली आहे. ममता बॅनर्जी यांनीच पीएमओमधून आलेला कॉल घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. फोनी वादळासंदर्भात ममता यांना पीएमओकडून फोन करण्यात आला होता. मात्र, ममतांनी बोलण्यास नकार दिल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील फोनी वादळासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करण्याऐवजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थीतीचा आढावा घेतला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातील सुत्रांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ममत यांनीच फोन घेण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर पीएमओने ही माहिती दिली. शनिवारी सकाळी दोनवेळा ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या स्टाफने ममता बॅनर्जी यांना फोनही केला होता. मात्र, ममता बॅनर्जी एका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे परत येताच त्या पंतप्रधानांना फोन करतील, असे सांगण्यात आल होते. याप्रकारे दोनवेळेस संपर्क साधूनही मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, असे सांगण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनी चक्रीवादाळानंतर ओडिशाचे मुख्यंमत्री नवीन पटनायक यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे मोदींकडून शिष्टाचार नियमांचा अपमान केल्याचं तृणमूल काँग्रेसने म्हटले होते.