ममता यांनी दिली थेट मोदी-शहांना टक्कर; विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरल्या अग्रेसर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:12 PM2019-05-16T13:12:55+5:302019-05-16T13:14:20+5:30
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचाराला रंगत आली असताना सर्व देशाचं लक्ष्य पश्चिम बंगालमधील होणाऱ्या राजकारणाकडे लागलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टक्कर दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पश्चिम बंगालमधील कडवी लढत दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यानंतर मायावतीपासून राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर भविष्यात गरज पडलीस तर विरोधी पक्ष ममता बॅनर्जी यांच्यामागे उभे राहण्याचे संकेत मिळेत आहेत.
कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोमध्ये हिंसाचार घडला त्यानंतर निवडणूक आयोगानेही कडक कारवाई करत पश्चिम बंगालमधील प्रचारावर एक दिवस आधीच बंदी आणली. गुरुवारी रात्री 10 पर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येईल असे निवडणूक आयोगाने आदेश दिले. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं.
ममता यांच्यामागे उभा राहिला विरोधी पक्ष
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस, मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये 2 सभा असल्यानेच निवडणूक आयोगाने रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास मुभा दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला.
ममता बॅनर्जी यांनीही विरोधी पक्षातील नेत्यांचे ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालांपूर्वी विरोधी पक्ष पश्चिम बंगालमधील राड्यानंतर एकत्र झाला. ते भाजपासाठी चिंतीत करणारे आहे. पश्चिम बंगालमधील ही घटना विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांना स्पर्धेत अग्रेसर करत आहे.
Thanks and gratitude to @Mayawati, @yadavakhilesh, @INCIndia, @ncbn and others for expressing solidarity and support to us and the people of #Bengal. EC's biased actions under the directions of the #BJP are a direct attack on democracy. People will give a befitting reply
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 16, 2019
मागील काही महिन्यांपूर्वीही ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालमधील राडा महत्त्वपूर्ण ठरला आहे.