नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विविध मुद्द्यांवरून आपल्या भाषणांतून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखी चिघळला असून तिथे गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. यावरून आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धासाठी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा एक व्हिडीओ पोस्ट करून एक चिंता व्यक्ती केली आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यांनी ममता बॅनर्जींचा एक व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी मोदी सरकारला म्हणत आहेत की, "रशिया युक्रेनमधलं युद्ध सुरू करण्यापूर्वी तुम्ही विचार करायला हवा होता की आमची विद्यार्थी युक्रेनमधून परत येतील, तेव्हा कुठे खातील, कुठे जातील, त्यांचा अभ्यास कसा सुरू ठेवतील? तुम्ही केवळ पोकळ आश्वासनं देत आहात."
भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी ह्या व्हिडीओसोबत केलेल्या ट्वीटमध्ये हे अकल्पनीय आहे असं म्हटलं आहे. त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनाही टॅग केलं आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या या विधानाची दखल घेण्यास सांगितलं आहे. त्यांच्यामते, या विधानामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होऊ शकतो.
"हे अकल्पनीय आहे. माननीय ममता बॅनर्जी यांनी सर्व सीमा ओलांडल्या आणि रशिया युक्रेनच्या युद्धासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं. त्यांनी असा विचार केला नाही का की हे शब्द देशाच्या विरोधात वापरले जाऊ शकतात? आपल्या परराष्ट्र धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर याचा परिणाम होऊ शकतो" असं अधिकारी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.