शुभेंदू यांना संपविण्यासाठीच ममता नंदीग्राममध्ये निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:44 AM2021-03-15T01:44:57+5:302021-03-15T06:56:04+5:30
ही माहिती दस्तुरखुद्द शुभेंदू अधिकारी यांचे वडील व सध्या एकाकी पडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना दिली.
नंदीग्राम : तृणमूल काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा विडा उचलला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Mamata is contesting in Nandigram to end Shubhendu)
ही माहिती दस्तुरखुद्द शुभेंदू अधिकारी यांचे वडील व सध्या एकाकी पडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना दिली.
ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष एखाद्या खासगी कंपनीसारखा चालविला आहे. त्यांनी आपला भाचा अभिषेक चॅटर्जी याचे स्तोम वाढवून ठेवले आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते पश्चिम बंगालमधील प्रचारसभांतून सातत्याने करत आहेत.
शुभेंदू अधिकारी यांनी नाव न घेता ममता बॅनर्जींवर जाेरदार टीका करताना सांगितले, की नंदीग्राममध्ये गाेळीबारासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी पदाेन्नती दिली.
अधिकारी कुटुंबामध्ये राजकीय दुफळी -
तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांचे दोन्ही पुत्र शुभेंदू व सोमेंदू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिसरा पुत्र दिव्येंदू हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदारपदी निवडून आले आहेत. अधिकारी कुटुंबामध्येच राजकीय दुफळी निर्माण झाली. तृणमूल काँग्रेसमधील सर्वांनीच माझ्याशी बोलणे बंद केले आहे असे खासदार शिशिर अधिकारी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.