N. Biren Singh on Mamata Banerjee : कोलकाता येथील डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील विरोधीपक्ष भाजप मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अशातच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईशान्य भारताबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग संतापले असून, त्यांनी कठोर शब्दात ममता बॅनर्जींना सुनावले.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले की, "ममता दीदी ईशान्य भारताला धमकावण्याची तुमची हिम्मत कशी झाली...या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही ईशान्य आणि उर्वरित देशाची सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे. आपल्या राजकारणातून हिंसाचार आणि द्वेष पसरवणे थांबवा. सार्वजनिक व्यासपीठावर हिंसाचाराची धमकी देणे राजकीय नेत्यासाठी अयोग्य आहे," असे त्यांनी म्हटले.
हिमंता बिस्वा सरमा यांचा पलटवार आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीदेखील ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, "दीदी, तुमची आसामला धमकावण्याची हिम्मत कशी झाली? आम्हाला लाल डोळे दाखवू नका. आपल्या अपयशाच्या राजकारणाने भारताला जाळण्याचा प्रयत्नही करू नका. फूट पाडणारी भाषा बोलणे आपल्याला शोभत नाही."
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?भाजपने पुकारलेल्या बंगाल बंदसंदर्भात बोलताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काही लोकांना वाटत आहे की, हा बांगलादेश आहे... मला बांग्लादेश आवडतो, तेथील लोकही आमच्यासारखेच बोलतात. बांग्लादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. पण लक्षात ठेवा बांग्लादेश एक वेगळा देश आहे आणि भारत एक वेगळा देश आहे. मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून आग लावत आहात, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही... आपली खुर्चीही हालेल," अशी टीका त्यांनी केली.