कुचबिहार : केंद्रीय योजनांचा अन्य राज्यांना मिळत असलेला लाभ विकासाच्या मार्गातील गतिरोधक बनलेल्या ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालला मिळू शकला नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राज्यातील जनता विरोधात गेल्यामुळे ममता बॅनर्जी यांची घाबरगुंडी उडाल्याचा दावाही मोदी यांनी केला.
येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होणार हे कळून चुकल्याने ममता बॅनर्जी त्याचा सारा राग पश्चिम बंगालमधील सरकारी अधिकाऱ्यांवर तसेच निवडणूक आयोगावर काढत आहेत. कुचबिहारमधील सभेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहू नयेत म्हणून राज्य सरकारने नाना उपाय करून पाहिले. परंतु अशा बालिश वर्तनाने निवडणुका जिंकता येत नाहीत. ममता बॅनर्जी यांच्या जुलमी राजवटीपासून पश्चिम बंगालमधील जनतेला मुक्तता हवी आहे. इथे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचे राज्य सुरू असून त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी लोक आता समर्थ पर्यायाच्या शोधात आहेत. गरीबातल्या गरीब माणसाचे बँकखाते आता उघडण्यात आले असून हे केवळ भाजप सरकारमुळेच शक्य झाले. प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस, मोबाइल फोन, इंटरनेट पाहायला मिळते ते आमच्याच सरकारमुळे. ममता बॅनर्जी गतिरोधकाची भूमिका बजावत असून त्यांनी राज्याच्या विकासात अडथळे निर्माण केले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या घोटाळ्यांमुळे पश्चिम बंगालची प्रतिमा कलंकित झाली आहे.भाजपच्या प्रत्येक कामगिरीवर टीकामोदी यांनी सांगितले की, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ले चढविले. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या प्रत्येक कामगिरीवर ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानपद पुन्हा निर्माण करावे अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. एकाच देशात दोन पंतप्रधान असावेत, अशी मागणी करणाऱ्या लोकांसोबत ममता बॅनर्जी यांनी राजकीय हातमिळवणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.