कोलकाता : तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते, कार्यकर्ते आता आमच्याकडे येत असून, त्यामुळे एके दिवशी त्या पक्षात एकट्या ममता बॅनर्जी याच शिल्लक राहतील, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तृणमूलचा त्याग केलेले शुभेंदू अधिकारी तसेच विविध पक्षांचे नऊ आमदार व तृणमूलच्या एका खासदाराने शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.कम्युनिस्टांना २५ वर्षे दिलीत, तृणमूलला १० वर्षे दिलीत, त्याआधी काँग्रेसला बराच काळ सत्ता दिली. आता आम्हाला पुढील पाच वर्षे द्या, असे आवाहन शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला केले. ते मिदनापूरच्या जाहीर सभेमध्ये बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या ताफ्यावर या राज्यात नुकताच हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर अमित शहा पश्चिम बंगालमध्ये शनिवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
शेतकऱ्याच्या घरी घेतले दुपारचे जेवणपश्चिम मिदनापूर जिल्ह्यातल्या बालिझुरी येथे सनातन सिंह या शेतकऱ्याच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुपारचे जेवण घेतले. अमित शहा यांनी शनिवारी सकाळी कोलकातातील स्वामी विवेकानंदांच्या जन्मस्थळी तसेच मिदनापूर येथे क्रांतिकारक खुदीराम बोस यांच्या घराला भेट देऊन त्यांना वंदन केले.