दार्जिलिंग : केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली नाही, त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'केंद्रातील भाजपा सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय नेता मानत नाही, त्यामुळेच केंद्र सरकारकडून त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.'
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, 'केंद्र सरकार बहुधा नेताजींना राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मान्य करण्यास तयार नाही. नेताजींनी देशातील विविध भागांमधून तरुणांना एकत्रित करून इंडियन नॅशनल आर्मी उभारली. नेताजींच्या दृष्टिकोनामध्ये राष्ट्राच्या आणि नागरिकांच्या एकीला अनन्यसाधारण महत्व होते.'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावर नेताजींच्या संग्रहालयाचे उदघाटन केले.