नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत. यासाठी त्या जंतरमंतरवर धरणे करणार आहेत. या रॅलीचे आयोजन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील हजर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बॅनर्जींच्या स्वागताचे आणि खिल्ली उडविणारे बॅनर झळकू लागले आहेत.
कोलकाता आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी छापा टाकण्यास गेल्यावरून गेल्या आठवड्यात बंगालमध्ये वातावरण तापले होते. यावेळी ममता यांनी दोन दिवसांच्या धरणे आंदोलनामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच 19 जानेवारीला झालेल्या एका रॅलीमध्ये 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. यामुळे आजचे हे आंदोलनही विरोधी पक्षांची एकजूट दाखविण्यासाठी माध्यम बनणार आहे.
कोलकाताहून दिल्लीला येण्याआधी ममता यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट संपली आहे. 15 दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. निवडणुकीनंतर आम्ही नवीन सरकार बनलेली पाहू. देश बदल पाहू इच्छितो. देशातील जनता त्या अखंड भारताला पाहू इच्छितो, जेथे लोकशाही कायम असेल.
ममता यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या आहेत. केंद्र सरकार राज्यांच्या यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा आणि गुजरातला परतावे. हे सरकार एक व्यक्ती आणि एका पक्षाची सरकार आहे, असा आरोप केला होता. या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच देशाची बिग बॉस आहे, असं म्हणत ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा आमच्यासाठी नैतिक विजय आहे. केंद्र सरकारकडून घटनेचं उल्लंघन सुरू आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करू. कोणीही या देशाचं बिग बॉस होऊ शकत नाही. केवळ लोकशाहीच इथली बिग बॉस आहे,' असं ममता म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयात आज जे काही झालं, तो देशाचा, घटनेचा, तरुणांचा विजय आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या.