नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींनापंतप्रधान मानत नाही असं बोलणाऱ्या ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधीला सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आणि ममता यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात समोर आले.
एकमेकांविरोधात आक्रमक भाषेचा प्रयोग प्रचारात केला गेला. इतकचं नाही तर पश्चिम बंगालमध्ये फनी वादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जी यांना फोन केले ते फोनदेखील घेतले गेले नाहीत, बैठकीला ममता बॅनर्जी यांनी उपस्थित राहण्यात नकार दिला होता. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील राजकारण तापू लागलं होतं.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या लढाईत भाजपाला १८ जागा जिंकण्यात यश आलं तर २२ जागांवर तृणमूल काँग्रेसला समाधान मानावं लागलं होतं. भाजपाच्या विजयात मुकुल रॉय, कैलाश विजयवर्गीय यांचा मोलाचा वाटा होता. गेली अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या तृणमूल काँग्रेसला भाजपाने जबरदस्त धक्का दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान आणि काही मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.
तत्पूर्वी भाजपाने तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार सुभ्रांशु रॉय, तुष्क्रांति भट्टाचार्य यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर सीपीएमचे आमदार विधायर देवेंद्र रॉय सुद्धा भाजपात सामील झाले आहेत. तृणमूल काँग्रेसचे दोन आणि सीपीएमच्या एका आमदारांने भाजपात प्रवेश केला आहे. तर 50 हून अधिक नगरसेवकांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय दर महिन्याला तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपात सामील होतील. सात टप्प्यात तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतील, हा तर पहिला टप्पा आहे, असे भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणे यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.