कोलकाता - पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मागच्या काही काळात ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन त्या हिंदुत्वाच्या विरोधात असल्याची त्यांची प्रतिमा भाजपाने तयार केली आहे. हीच प्रतिमा बदलण्याचा ममता बॅनर्जींनी प्रयत्न सुरु केला आहे.
आपण हिंदुंच्या विरोधात नाही. सहिष्णू हिंदू आहोत हा संदेश देण्याचा ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. 26 डिसेंबरला ममता बॅनर्जी गंगासागरला गेल्या होत्या. तिथे त्या तासभर कपिलमुनींच्या आश्रमात थांबल्या होत्या. मुख्य पूजारी ग्यानदासजी यांच्याबरोबर त्यांनी तासभर चर्चा केली. ममता बॅनर्जींच्या या गंगासागर भेटीकडे विश्लेषक राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत.
गंगासागरमधून गंगा नदी वाहते. येत्या 14 जानेवारीला मकरसंक्रातीला लाखो लोक पवित्र स्नानासाठी इथे येतात. मी पुन्हा गंगासागरला येईन असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या तृष्टीकरणाचा आरोप होत आहे. त्याचमुळे संतुलन साधण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून आता असे प्रयत्न होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मताधिक्क्यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. साबांग आणि डाकक्षीन कांथी येथे पक्ष संघटना नसतानाही भाजपाला ब-यापैकी मते मिळाली. साबांग विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमुल काँग्रेसला 1 लाख 6 हजाराहून जास्त मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाला फक्त 5610 मते होती. पण पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला 37 हजार 476 मते मिळाली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी रणनिती बदलल्याची चर्चा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाची दिशा पकडल्याचा संदेश त्यातून गेला आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या जागा वाढण्यामध्ये झाला. त्यामुळे ममता बॅनर्जी आता त्याच दिशेने जात आहेत.