नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या दिल्लीत भेटीगाठी सुरु झाल्याचे दिसत आहे. ममता यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. तसेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना नेहमीच टार्गेट करणाऱ्या ममता यांनी अडवाणींची भेट घेताच, राजकीय वर्तुळात व सोशल मीडियावरुन अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
ममता बॅनर्जी यांनी अडवाणींचे पाय धरुन आशिर्वाद घेतला. अडवाणी आणि ममता यांच्यात जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यातील सुरू असलेल्या वादाबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र, अडवाणींसोबतच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे. तर सोशल मीडियावरही या भेटीवरुन काहींनी गमतीदार ट्विट केले आहेत. 'चला कुणीतरी भेटायला आले, अडवाणीजींना कुणीतरी लक्षात ठेवतयं,' असे ट्विट एका युजरने केले आहे.
आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NCR) लागू करण्यात आलं आहे. त्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहांचा पश्चिम बंगाल दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी 2019 मध्ये ममता यांनी एका मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे. त्यामुळे मतता यांनी दिल्लीत भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशीही त्यांची भेट झाली. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही त्या भेट घेणार आहेत.