नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उत्तर बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अलीपूरद्वार जिल्ह्यात पोहोचलेल्या ममता यांनी भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे. ममता यांनी "भाजपा आमच्या बंगालचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तसेच यासाठी आम्हाला आमचे रक्त सांडावे लागले तरी आम्ही हे कधीही होऊ देणार नाही असंही म्हटलं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या दौऱ्यादरम्यान हासीमारा येथील मलंगी लॉजसमोर पोहोचल्या तेव्हा महिला समर्थकांनी "दी आय लव्ह यू" म्हणत ममता यांचे जल्लोषात स्वागत केले. मिळालेल्या माहितीनुसार, ममता यांनी मलंगीमध्ये रात्र विश्रांती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री मंगळवारी अलीपूरद्वारला रवाना झाल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी परेड ग्राऊंडवर पोहोचून अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्याचवेळी, बैठकीनंतर, ममता बॅनर्जी बुधवारी कलचिनी ब्लॉकमधील सुभाषिनी मैदानावर आयोजित सरकारी कार्यक्रमात भाग घेणार आहेत. याच दरम्यान ममता बॅनर्जी अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही करणार आहेत. सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचा कार्यक्रमही आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.