कोलकाता- लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान विजय मिळवल्यानंतर पश्चिम बंगालमधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेला ममता बॅनर्जींनी भाजपाला जबाबदार धरलं आहे. तसेच भाजपाला पश्चिम बंगालमध्ये विजयी रॅली काढू देणार नाही, असंही ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे. तसेच या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत. 24 परगाणा जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या टीएमसी नेते निर्मल कुंडू यांच्या घरी जाऊन ममतांनी सांत्वन केलं आहे.त्या म्हणाल्या, भाजपा विजयी रॅलीच्या नावावर हुगली, बांकुरा, पुरुलिया आणि मिदनापूरमध्येही हिंसा करत आहे. आतापासून भाजपाला अशी एकही विजयी रॅली काढता येणार नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवसांहून अधिकचा काळ लोटला आहे. तरीही कोणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यास पोलिसांनी त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी. अशा लोकांविरोधात कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देत असल्याचंही ममता म्हणाल्या आहेत.ममतांनी गुरुवारी सीआयडी आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांबरोबर हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. याच भागात तृणमूलचा कार्यकर्ता निर्मल याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासनही ममता बॅनर्जींनी निर्मलच्या कुटुंबीयांना दिलं आहे. कुचबिहारमधील पेटला बाजारा परिसरात बुधवारी (5 जून) तृणमूलच्या एका कार्यकर्त्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच भाजपाने ही हत्या केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विजयी रॅली काढू देणार नाही- ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 8:14 AM