दरभंगा- बिहारमधील दरभंगा येथे एका चौकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यामुळे एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी स्पष्ट केले आहे. दरभंगा येथील ७० वर्षे वयाच्या या व्यक्तीवर काल मोटरसायकलवरुन आलेल्य़ा ४० ते ५० जणांनी हल्ला केला आणि त्याचं डोकं उडवलं होतं. येथील एका चौकाचे नाव नरेंद्र मोदी चौक असे केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असा आरोप या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र या चौकात लावण्यात आलेला नामफलक आधीपासूनच होता.
या हत्येचा आणि नामफलकाचा काहीही संबंध नाही असं सुशील मोदी यांनी स्पष्ट केले. मोटरसायकलवरुन हॉकीस्टीक्स तलवारी घेऊन आलेल्या लोकांना समजवाण्याचा प्रयत्न माझ्या वडिलांनी केला परंतु त्यांचं डोकं उडवण्यात आलं अशी माहिती हत्या झालेल्या व्यक्तीच्या मुलाने सांगितले. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांच्या नावाने या चौकाचे नामकरण मारेकऱ्यांना करायचे होते म्हणूनच त्यांनी हा हल्ला केला. त्यांना माझ्या भावालाही मारायचे होते असे त्याने सांगितले. पोलिसांनी आपण काही लोकांना अटक केली असून त्यांचे जबाब नोंदवणे सुरु असल्याचं सांगितलं आहे.
भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी ही हत्या झाल्यानंतर 'अॅवॉर्ड वापसी गँग ' ने आता बाहेर यावं अशा शब्दांमध्ये सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना आवाहन करत टीका केली आहे.