ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरीप्रकरण ताजे असतानाच कोळसा व उर्जा मंत्रालयातही हेरगिरी होत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी सकाळी लोकेश नामक व्यक्तीला अटक केली असून लोकेशवर उर्जा मंत्रालयातील गोपनीय दस्ताऐवजची चोरी केल्याचा आरोप आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याचा प्रकार दिल्ली पोलिसांनी उघड केला होता. याप्रकरणा आत्तापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये पेट्रोलियम कंपन्यांमधील वरिष्ठ अधिका-यांचाही समावेश आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता दिल्ली पोलिसांनी कोळसा व उर्जा मंत्रालयातील हेरगिरी उघड केली आहे. पोलिसांनी नोएडा येथे उर्जा सल्लागार कंपनी चालवणा-या लोकेश नामक व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर मंत्रालयातील कागदपत्रांची चोरी, बेकायदेशीररित्या प्रवेश करणे, चोरीची कागदपत्र स्वीकारणे, कट रचणे, फसवणूक अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.