भुवनेश्वर, दि. 12 - एका व्यक्तीनं केवळ दारू आणि मोबाइल फोन विकत घेण्यासाठी स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाचा केवळ 25 हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील ही घटना आहे. बलराम मुखी असे आरोपीचे नाव असून त्यानं स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाला केवळ दारू आणि मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना विकले. याप्रकरणी पोलिसांनी या लालची बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलराम मुखीनं दारू व मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना आपल्या मुलाला विकले. मिळालेल्या या रकमेतून त्यानं दोन हजार रुपयांचा मोबाइल फोन आणि सात वर्षांच्या मुलीसाठी त्यानं 1500 रुपयांचे पैजण विकत घेतले व उरलेले सर्व पैसे त्यानं फक्त दारू खरेदीवर खर्च केले.
याप्रकरणी पोलिसांनी मुखीची पत्नी सुकुतीची चौकशी केली. दरम्यान, या दाम्पत्याला आणखी एक मुलगादेखील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भ्रदकचे पोलीस अधीक्षक अनुप साहू यांनी सांगितले की, बलराम मुखी हा सफाई कर्मचारी असून त्याच्याकडे नियमित उत्पन्नाचे असे कोणतेही स्त्रोत नव्हते. दरम्यान, या प्रकरणात त्याचा मेहुणा बलिया आणि एका अंगणवाडी कार्यकर्त्याचाही समावेश आहे.
मुखीनं आपल्या मुलाला सोमनाथ सेठी नावाच्या व्यक्तीला विकलं. यावर प्रभारी निरीक्षक मनोज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ सेठी यांच्या 24 वर्षीय मुलाचा 2012 मध्ये मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूमुळे सोमनाथ यांची पत्नी नैराश्य अवस्थेत गेली होती. मुलगा गमावल्याच्या धक्क्यातून पत्नीनं बाहेर यावं, यासाठी सोमनाथ यांनी मुखीकडून त्याच्या 11 महिन्यांच्या बाळाला विकत घेतले. दरम्यान, या घटनेवरुन लालसेपोटी एखादी व्यक्ती किती खालच्या स्तरावर पडू शकते, याबाबत काहीही सांगता येऊ शकत नाही.