लोक अनेकदा वेळ वाचवण्यासाठी ऑनलाइन कॅब सेवा वापरतात. पण अलीकडेच अशा काही घटना समोर आल्या आहेत, ज्याचा संबंध कॅबमधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेशी आहे. सोशल मीडियावरील एका युजरने काही दिवसांपूर्वी ओला कॅबमध्ये आलेला एक भयंकर अनुभव शेअर केला. सिंपली ब्लडचे संस्थापक किरण वर्मा यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे जी खूपच धक्कादायक आहे.
ओला कॅब ड्रायव्हरचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, "या ओला कॅब ड्रायव्हरने माझ्या मुलासमोर मला कानशिलात लगावली आणि मी तुम्हाला विनंती करतो की आतापासून ओला बुक करू नका." किरण वर्मा काही दिवस दिल्लीत होते. यावेळी ते विमानतळावरून ओळखीच्या व्यक्तीला घेण्यासाठी ओलाने जात होते, त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. वर्मा म्हणाले, "ड्रायव्हरने मला राइड रद्द करण्यास आणि कॅश पेमेंट करण्यास सांगितलं, मी नकार दिला आणि प्रवास सुरू केला. तो आमच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेने गेला आणि मी त्याला विचारले तेव्हा त्याने ट्रॅफिक जाम असल्याचे उत्तर दिलं."
"ड्रायव्हरने गाडी थांबवून मला जास्तीचे पैसे देण्यास सांगितले तेव्हा आम्ही एक किलोमीटरही गेलो नव्हतो. विनाकारण माझ्यावर ओरडू लागला. माझा सहा वर्षांचा मुलगा घाबरला आणि मला गाडी सोडायला सांगितली. मी माझ्या मुलाला इतका घाबरलेला बघू शकलो नाही आणि त्याला शांत करण्याचा विचार केला." वर्मा सांगतात की, त्यांनी ओला हेल्पलाइनवर कॉल केला आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधला आणि कॅबमधून बाहेर पडले.
ड्रायव्हरने बॅग देण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी ड्रायव्हर सामोर जाऊन त्याचा फोटो काढला. ड्रायव्हरने गाडीतून बाहेर येऊन त्यांना कानशिलात लगावली. कंपनीने अद्याप वर्मा कॉल केला नाही, सोशल मीडियावर अनेकांना वर्मा यांना पाठिंबा दिला आहे आणि ओलाकडे ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.