हैदराबाद: तेलुगू देसम पक्षाचे (TDP) ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशातील माजी खासदार शेषगिरी राव यांच्यावर गुरुवारी सकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या घराबाहेरच हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर साधूच्या रूपात आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हल्लेखोराने आधी माजी खासदाराकडे दान मागितले आणि अचानक राव यंच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो फरार झाला आहे. टीव्हीने9 हिंदीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
शेषगिरी राव हल्ल्यानंतर आंध्र प्रदेशातील तुनी शहरात त्यांच्या घराबाहेर जखमी अवस्थेत पडले होते. काही वेळाने घरात उपस्थित लोकांनी त्यांना पाहिले आणि तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. सध्या ते काकीनाडा येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गुन्हा दाखल, हल्लेखोराचा शोध सुरू पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवून पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी हल्लेखोर साधूचे कपडे परिधान करून राव यांच्या घरी पोहोचला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेल्याचे लोकांचे म्हणणे आहे. राव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच टीडीपी नेते आणि कार्यकर्ते सर्वजण रुग्णालयात पोहोचले. त्याठिकाणी पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. हल्लेखोराला लवकर पकडण्याची मागणीही त्यांनी केली आहे.