अलिगढ: रुग्णालयाचं बिल न दिल्यानं कर्मचाऱ्यांकडून रुग्णाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अलिगढमध्ये घडली आहे. यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. सुलतान खान असं मृत पावलेल्या रुग्णाचं नाव असून तो अलिगढमधील इग्लास गावचे रहिवासी होते. सुलतान खान त्यांच्या काही नातेवाईकांसह एका खासगी रुग्णालयात गेले होते. मात्र तेथील उपचार महाग असल्यानं त्यांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात आल्याबद्दल प्रशासनानं त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, अशी माहिती खान यांच्या कुटुंबीयांनी दिली. याबद्दल संबंधित रुग्णालयाकडे विचारणा केली असता, त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं असून त्यात रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेली झटापट दिसत आहे. 'क्वार्सी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेशदेखील दिले आहेत. संबंधित रुग्णाचा शवविच्छेदन आल्यानंतर त्याला झालेल्या जखमांचं स्वरुप लक्षात येईल. त्यामधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. यानंतर पुढील तपास केला जाईल,' अशी माहिती अलिगढचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिली.'सुलतान खान गुरुवारी एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी गेले होते. तिथे त्यांचा बिलावरून वाद झाला. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत खान यांचा मृत्यू झाल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे,' अशी माहिती अभिषेक यांनी सांगितली. कोणतेही उपचार न करता रुग्णालयानं खान यांच्याकडे ४ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
धक्कादायक! चार हजारांच्या बिलावरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मारहाण; रुग्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 11:53 AM