... तरीही पत्नीच्या संपत्तीचा मालक नवराच, हायकोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 05:45 PM2018-08-11T17:45:24+5:302018-08-11T17:47:49+5:30
एखाद्या पतीने ज्ञात उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती पत्नीच्या नावे असेल तर त्या मालमत्तेचे मालकी हक्क पतीकडेच राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.
नवी दिल्ली : एखाद्या पतीने ज्ञात उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती पत्नीच्या नावे असेल तर त्या मालमत्तेचे मालकी हक्क पतीकडेच राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, यावेळी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविण्यात आला.
कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल देताना एका जुन्या कायद्याचा आधार घेतला होता. मात्र, सध्या हा कायदा अस्तित्त्वातच नाही. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने निर्णय देताना गंभीर आणि मुलभूत चूक केली, असे म्हणावे लागेल. पूर्वीचा कायदा सध्या अस्तित्त्वातच नाही, ही बाब कनिष्ठ न्यायालयाने ध्यानातच घेतली नाही, असे न्यायमूर्ती वाल्मिकी जे. मेहता यांनी सांगितले.
पत्नीच्या नावे खरेदी करण्यात आलेल्या संपत्तीवर पती दावा करु शकत नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते. बेहिशेबी देवाणघेवाण कायद्यातंर्गात हा गुन्हा आहे, हा आधार न्यायालयाने ग्राह्य धरला होता. मात्र, ही संपत्ती वैध उत्पन्न स्त्रोतातून खरेदी करण्यात आली होती, असा युक्तिवाद पतीच्या वकिलांनी केला. तसेच, 2016 साली बेहिशेबी संपत्तीच्या नियमांमध्ये झालेल्या सुधारणांनुसार हा गुन्हा ठरत नाही, असेही यावेळी वकिलांनी म्हटले होते.