हैदराबाद – कोरोना महामारीच्या संकटात एकीकडे अनोळखी व्यक्तीही मदत करण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसून येते तर दुसरीकडे माणुसकीलाही लाज वाटेल अशा घटना घडत असल्याचं समोर येत आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एक व्यक्ती लोकांकडे मदतीची विनवणी करत होता परंतु कोणीही पुढं आलं नाही. ना त्याला अँम्ब्युलन्स मिळाली ना त्या व्यक्तीची अवस्था पाहून कोणाचं मन हेलावलं. अखेर स्वत: पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पतीने साडेतीन किलोमीटर पायपीट करत क्रबिस्तानपर्यंत पोहचून तिला दफन केले.
स्वामी आणि त्याची पत्नी रेल्वे स्टेशनबाहेर भीक मागून जीवन जगतात. रविवारी संध्याकाळी अचानक स्वामीची पत्नी नागालक्ष्मी हिची तब्येत बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. स्वामीने पोलिसांपासून रिक्षा चालकापर्यंत सगळ्यांची मदत मागितली. परंतु त्याच्या पत्नीचा मृतदेह दफनभूमीपर्यंत पोहचवण्यासाठी कोणतंही वाहन उपलब्ध झालं नाही. प्रत्येक ठिकाणी मदत मागायला गेल्यानंतर त्याला पळवून लावलं.
कोरोनाच्या भीतीनं कुणीही पुढं आलं नाही.
कोरोनाच्या भीतीनं मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अंत्यसंस्कारासाठी काही जणांनी पैसे देऊन मदत केली. पण नागालक्ष्मीचा मृतदेह कित्येक वेळ रस्त्यावरच पडून होता. जेव्हा कोणीही स्वामीच्या मदतीसाठी पुढे आलं नाही तेव्हा स्वामीने स्वत:च्या खांद्यावर पत्नीचा मृतदेह घेऊन साडेतीन किमी दूर असलेल्या इंदिरानगर दफनभूमी इथपर्यंत पायपीट केली.
रस्त्यात थांबून मागत होता मदत
रस्त्यामधून जाताना स्वामी लोकांकडे मदत मागत होता. स्वामी रेल्वे पोलिसांकडेही गेला परंतु पोलिसांनी स्वामीला अडीच हजार रुपये देऊन त्याला तिथून परत पाठवलं. दफनभूमीत पोहचल्यानंतर काही जणांनी त्याला खड्डा खोदण्यासाठी मदत केली. स्वामी स्वत: खूप थकला होता. पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तो पायपीट करत होता. रस्त्यात कुठेही तो थांबला नाही. थेट दफनभूमीत पोहचून त्याने पत्नीचा मृतदेह दफन केला.