नवी दिल्ली-
विमानात टॉयलेटमध्ये सिगारेट ओढणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीविरोधात विमानात सिगारेट ओढण्यासोबतच इतर प्रवाशांना तसंच क्रू-मेंबर्ससोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे. ही घटना लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात घडली आहे.
आरोपीचं नाव रमांकात असून तो मूळचा भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीविरोधात आयपीसी कलम ३३६ आणि विमान कायदा १९३७ च्या कलम २२, २३ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानात काय घडलं?एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सनं पोलिसांनी सांगितलं की, विमानात धूम्रपान करण्यास मनाई आहे. पण संबंधित व्यक्ती जेव्हा बाथरुममध्ये गेला तेव्हा अलार्म वाजला. क्रू मेंबर्सनं तेव्हा पाहणी केली तेव्हा बाथरुममध्ये गेलेल्या त्या व्यक्तीच्या हातात सिगारेट होती. आम्ही तातडीनं सिगारेट फेकून दिली.
क्रू मेंबर्सनं सिगारेट फेकून दिल्यामुळे प्रवासी संतप्त झाला आणि ओरडू लागला. कसंबसं करुन आम्ही त्याची समजून काढून सीटवर बसवलं. पण काही वेळानं त्यानं विमानाचा दरवाजा उघण्याचा प्रयत्न केला, असं क्रू मेंबर्सनं सांगितलं. त्याच्या अशा वागणुकीमुळे इतर प्रवासी देखील घाबरले होते. तो अजिबात ऐकायला तयार नव्हता आणि सातत्यानं आरडाओरडा करत होता. यानंतर आम्ही त्याचे हातपाय बांधून सीटवर बसवून ठेवलं, असं क्रू मेंबर्सनं पोलिसांना सांगितलं आहे.
पोलिसांनी पुढे माहिती दिली की, हातपाय बांधल्यानंतरही तो शांत बसला नाही. त्यानं आपलं डोकं आपटण्यास सुरुवात केली. विमानातील प्रवाशांमध्ये एक डॉक्टर होता. त्यानं संबंधित प्रवाशाची तपासणी केली. रमाकांतनं सांगितलं की त्याच्या बॅगमध्ये काही औषधं आहेत की त्याला घ्यायची आहेत. डॉक्टर प्रवाशानं त्याची बॅग तपासली पण औषधं काही सापडलं नाहीत. उलट बॅगेत एक ई-सिगारेट होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमाकांत विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसंच त्याला कोणता मानसिक आजार तर नाही ना? याची चौकशी केली जात आहे.
नियम काय सांगतो?इंडियन एअरक्राफ्ट अॅक्ट १९३७ मध्ये कलम २५ अनुसार विमानात सिगारेट ओढणं पूर्णपणे मनाई आहे. विमानात पायलट, क्रू मेंबर्स आणि प्रवासी धूम्रपान करु शकत नाहीत. तसंच यात असंही नमूद आहे की केंद्र सरकारनं जर निर्देश दिले असतील तर काही प्रकरणांत यात शिथिलता आणली जाऊ शकते.
कोणती कारवाई होऊ शकते?एअरक्राफ्ट नियमांनुसार विमानात गोंधळ घालणे, मद्यपान करणे, ड्रग्ज किंवा धूम्रपान करणे तसंच अपशब्द वापरणे, वाद घातल्यामुळे प्रवाशाला प्रवास करण्यापासून अडवलं जाऊ शकतं. तसंच विमानात खाली देखील उतरवलं जाऊ शकतं.
नियम २३ अनुसार जर एखाद्या प्रवाशानं मद्यपान किंवा ड्रग्जच्या नशेत फ्लाइटमध्ये सहप्रवाशांना त्रास दिला किंवा त्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर त्याला विमानातून खाली उतरवण्याचा अधिकार विमानातील क्रू-मेंबर्सना आहे.
डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशननं (DGCA) २०१७ साली यासंदर्भात काही गाइडलाइन्स देखील जारी केल्या आहेत. यात गैरवर्तणूकीची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. गैरवर्तणूक करणाऱ्या प्रवाशाला तीन महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत किंवा आजीवन हवाई प्रवासासाठी बंदी घालता येऊ शकते. तसंच विमानात हुल्लडबाजी करणे, वैमानिकाच्या सूचनांचं पालन न करणे, अपशब्द वापरणे, क्रू-मेंबर्सच्या कामात अडचण आणणे या सर्व गोष्टी गैरवर्तणुकीच्या वर्गवारीत येतात. यात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीच्या हवाई प्रवासावर निर्बंध येऊ शकतात.