ट्रेनी IPS अधिकारी अनु बेनीवाल यांचे लोकेशन ट्रेस करणाऱ्या एका आरोपीला ग्वाल्हेरमध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी जवळपास महिनाभर खाण माफियांच्या Whatsapp ग्रुपमध्ये ट्रेनी आयपीएसच्या हालचालींची माहिती, लोकेशन शेअर करत होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
बिजौली पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी म्हणून तैनात असलेल्या ट्रेनी IPS अनु बेनीवाल यांनी आजतकला सांगितलं की, स्विफ्ट कार जवळपास 25 दिवस सतत माझ्या कारजवळ दिसत होती, तो सतत माझा पाठलाग करत होता. याच दरम्यान, सोमवारी रात्री रुटीन चेकिंगसाठी बाहेर पडले असता, तीच गाडी पुन्हा पोलीस ठाण्याच्या बाहेर दिसली. मला संशय आल्यावर मी एका पोलीस कॉन्स्टेबलला माझ्या गाडीमध्ये बसवलं आणि त्या कारपर्यंत नेलं.
कारमध्ये असलेल्या व्यक्तीने कॉन्स्टेबलची कॉलर पकडली. हे पाहताच इतर पोलीस कर्मचारी धावत आले आणि त्यांनी कारस्वाराला पकडून पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीदरम्यान आरोपीचं नाव आमिर खान असून तो मुरैना जिल्ह्यातील जौरा येथील रहिवासी आहे. तो Whatsapp च्या लोकेशन नावाच्या ग्रुपचा एडमिन आहे. तो प्रत्येक लोकेशन खाण माफियांना पाठवत असे.
आरोपीकडे खाण व्यवसायाशी संबंधित स्वतःचे 9 डंपरही आहेत.आता आरोपीविरुद्ध बिजौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे. ग्वाल्हेर ग्रामीणच्या बिजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू उत्खननाचा व्यवसाय आहे.
अनु बेनीवाल या पोलीस ठाण्याच्या प्रभारी आहेत. अलीकडच्या काही दिवसांत त्यांनी अवैध खाणकामाशी संबंधित अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. यामुळे घाबरलेल्या खाण माफियांनी डंपर मालक आमिर खान याला अनु यांचे लोकेशन ट्रेस करण्याचं काम सोपवलं होतं. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अनेक मोठे खुलासेही होण्याची शक्यता आहे.