नवी दिल्ली - मोमोज खाणं अनेकांना आवडतं. पण तेच एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. मोमोज खाताना एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर आता नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) तज्ज्ञांनी 'काहीही खाताना सावधगिरीने गिळण्याचा' इशारा दिला आहे. एम्सच्या फॉरेन्सिक तज्ञांनी सांगितलं की मोमोज हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, ते खाण्यासाठीही मऊ असतं पण नीट न चावता ते गिळल्यास गुदमरून थेट मृत्यू देखील होऊ शकतो.
मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एम्सच्या अहवालानुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका 50 वर्षांच्या व्यक्तीला दक्षिण दिल्लीतून एम्समध्ये मृतावस्थेत आणण्यात आलं होतं. एका दुकानात जेवण करत असताना अचानक ते जमिनीवर पडले, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे पोस्टमॉर्टम केलं असता असं दिसून आलं की त्यांच्या श्वसनलिकेच्या सुरुवातीला पकोड्यासारखी वस्तू आहे. पण अधिक तपास केला असता तो मोमोज होता आणि नीट चावून न खाल्ल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
ही साधी गोष्ट वाटत असली तरी विषय गंभीर आहे. हा अहवाल जर्नल ऑफ फॉरेन्सिक इमेजिंगच्या ताज्या आवृत्तीत प्रकाशित करण्यात आला आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी मिंटला सांगितले की, हे निष्कर्ष वैद्यकीय मतांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, पण हे केवळ सीटी स्कॅनद्वारेच केले जाऊ शकतं.
एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाफवलेले मोमो हे दिल्लीच्या आवडत्या स्ट्रीट फूडपैकी एक आहेत. मोमोजचा पृष्ठभाग निसरडा आणि मऊ असतो. ज्यामुळे गुदमरल्यासारखे होऊ शकते आणि नीट चघळल्याशिवाय गिळल्यास ते प्राणघातक ठरू शकते. या विशिष्ट प्रकरणात, मृत्यूचे कारण न्यूरोजेनिक कार्डियाक अरेस्ट असू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.