नवी दिल्ली: मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रणा आणण्यात आली. मात्र यानंतरही त्रुटी कायम असल्याचं समोर आलं आहे. ईव्हीएमवर एकाला मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव झळकल्याचा प्रकार दिल्लीत घडला. या प्रकरणाची तक्रार न करण्याचा सल्ला मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी दिला. तक्रार केल्यास तुरुंगवास घडेल, असा 'धोक्याचा इशारा'देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातल्या मटियाला मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. ईव्हीएमवर एकाला मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव दिसल्यानं मिलन गुप्ता यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याबद्दल कोणतीही तक्रार न करण्याचा सल्ला दिल्याचं गुप्ता यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'ईव्हीएमवर लाल दिवा पेटला, पण व्हीव्हीपॅटवर वेगळ्याच व्यक्तीचं नाव दिसलं. मी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी मला नोडल अधिकाऱ्याकडे जाण्यास सांगितलं. त्यांनी मला सेक्शन अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला. या सगळ्यांनी मला तक्रार करू नका असं सांगितलं,' असं गुप्ता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तक्रार केल्यास भारतीय दंड विधानाच्या 177व्या कलमांतर्गत अटक करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा अधिकाऱ्यांनी दिल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. कलम 177च्या अंतर्गत अटकेची कारवाई न्यायालयाच्या आदेशाशिवाय करता येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल मला आश्चर्य वाटलं, असं गुप्ता म्हणाले. दिल्लीतल्या लोकसभेच्या सात जागांवर रविवारी मतदान झालं. दिल्लीत यंदा 60 टक्के मतदान झालं. दिल्लीत यंदा आप, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे.
मत दिलं एकाला, व्हीव्हीपॅटवर झळकला भलताच... पुढे जे झालं त्यानं 'तो' हादरलाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 3:19 PM