भोपाळ- मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील बमीठा ठाणे क्षेत्रात येणाऱ्या ग्राम गंजमधील एका व्यक्तीने पत्नीच्या विश्वासघातामुळे दुःखी होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने आत्महत्येचं कारण सांगण्यासाठी एक व्हिडीओ शूट केला होता. त्यामध्ये त्याने आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. व्हिडीओ शूट करून त्या व्यक्तीने भाऊजींना तो व्हिडीओ पाठवला. आत्महत्येसाठी त्याने पत्नीसह इतर पाच जणांवर आरोप केले आहेत.
पोलीस अधिकारी केके खनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमाकलमध्ये राहणारे तुलसीदास पटेल (वय 28) यांनी त्यांची पत्नी लीलावतीच्या विश्वासघातामुळे 25 मे रोज तिच्याच समोर विष पिऊन आत्महत्या केली. लीलावती डॉक्टर असून तिचं स्वतःचं क्लिनिक आहे. तुलसीदासने लीलावतीशी 19 एप्रिल रोजी लग्न केलं होतं. लग्नानंतर लीलावतीने तुलसीदासला संपूर्ण इस्टेट विकायला लावली. इस्टेट विकून आलेले पैसै लीलावतीने तिच्या क्लिनिकच्या कामासाठी वापरले. तुलसीदासकडे पैसा असेपर्यंत ते दोघं पती-पत्नीप्रमाणे राहिले पण नंतर लीलावतीच्या वागणुकीत बदल झाला.
तुलसीदासकडचे सगळे पैसे संपल्यावर लीलावतीने दुसऱ्या तरूणाशी मैत्री केली. आत्महत्या करायचा तीन दिवस आधी तुलसीदासला लीलावती तिच्या मित्राबरोबर घरात दिसली. त्यावेळी त्या तिघांमध्ये जोरदार वाद झाला. वादानंतर लीलावतीने तुलसीदासला घराबाहेर काढलं. पत्नीच्या विश्वासघातामुळे दुखावलेल्या तुलसीदासने शेतात जाऊन एक व्हिडीओ तयार केला व तो भाऊजींना पाठवला. 25 मे रोजी तुलसीदासने लीलावतीसमोरचं विष पिऊन आत्महत्या केली.