नवी दिल्ली - देशात अनेक अजब घटना सातत्याने समोर येत असतात. एका व्यक्तीने वयाच्या 32 व्या वर्षी एक-दोन नव्हे तर 12 लग्न केली आहेत. 12 महिलांचा पती झालेला हा व्यक्ती आजही स्वत:ला बॅचलर म्हणवतो. बिहारमधील किशनगंज आणि पूर्णियामध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. शमशाद नावाच्या या व्यक्तीने स्वतः बॅचलर असल्याचं सांगून अनेक लग्न केली आणि आता तो पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत होता पण यावेळी तो पोलिसांच्या हाती लागला. जेव्हा त्याची पोलखोल झाली, तेव्हा सर्वच हैराण झाले.
किशनगंज जिल्ह्यातील कोचाधामन पोलीस स्टेशन परिसरात राहणारा शमशाद उर्फ मुनव्वरने 12 लग्न केली होती. याच दरम्यान विशेष बाब म्हणजे एकाही पत्नीला त्याच्या दुसऱ्या पत्नीविषयीची माहिती नव्हती. त्याने लग्नाच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार मिळाल्यावर, पूर्णिया जिल्ह्यातील अंगढ पोलीस स्टेशनची घटना असल्याने अंगढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू झाला. तपासादरम्यान हा आरोपी कोचाधामण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनारकली येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी किशनगंज पोलिसांची मदत घेण्यात आली आणि अखेर त्याला बहादूरगंज पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली.
आरोपीने पोलिसांसमोर खुलासा केला की, तो लग्नानंतर सर्व पत्नींना घेऊन यूपीला जात असे. एसडीपीओ अन्वर जावेद यांनी सांगितलं की, शमशाद हा मुलींना सहजपणे आपल्या जाळ्यात अडकवतो. तो तरुणींसोबत लग्न करायचा आणि शेवटी सेक्स डीलसाठी यूपीला नेऊन विकायचा. अशा प्रकारे प्रत्येक पत्नीचा सौदा करून तो वेगवेगळ्या भागात जाऊन नवीन पत्नी शोधत असे. सध्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अनेक निरपराध लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. मात्र त्याच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अनगढचे स्टेशन प्रभारी पृथ्वी पासवान यांनी सांगितलं की, 27 नोव्हेंबर 2015 रोजी अनगढ पोलीस स्टेशन परिसरातून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये त्यांनी मोहम्मद शमशाद उर्फ मनोवरवर आपल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्न केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात तो तेव्हापासून सतत फरार होता, मात्र अनगड पोलिसांनी बहादूरगंज पोलिसांच्या मदतीने त्याला किशनगंज जिल्ह्यातून अटक केली.
अनगढ पोलीस स्टेशनचे एसआय शंकर सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 6 महिलांसोबत लग्नाची पुष्टी झाली आहे, ज्यामध्ये एक अनगढ पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे आणि 5 मुली किशनगंज जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय शमशाद हा सायको प्रकारचा माणूस आहे. तो मुलींसोबत प्रेमाचं नाटक करून लग्न करतो. पोलिसांनी आरोपी शमशाद याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.