मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका व्यक्तीने कोरोना (Corona) झाल्याच्या भीतीने रॉकेल प्राशन (kerosene) केल्याने मृत्यू झाला आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यात आली, ती निगेटिव्ह होती. (Man Drunk kerosene to kill corona on Friend's suggestion. )
या व्यक्तीला ताप आला होता. यामुळे त्याला कोरोना झाल्याचा संशय होता. यावर त्याला त्याच्या मित्राने रॉकेल पिण्याचा सल्ला दिला. रॉकेल पिल्याने कोरोना व्हायरस मरतो, असे त्याने सांगितले. या मित्राचा हा सल्ला ऐकून त्या व्यक्तीने रॉकेल प्राशन केले. मात्र, त्याची तब्येत बिघडली. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करत असताना त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली, ती निगेटिव्ह आली.
घटना भोपाळच्या अशोका गार्डनची आहे. महेंद्र नावाच्या व्य़क्तीला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. औषधे घेवूनही त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही. यामुळे त्याला कोरोनाची बाधा झाली नाही ना, अशी भीती वाटू लागली. यामुळे त्याने त्याच्या मित्राला फोन केला. तर मित्राने त्याला अजब सल्ला दिला. रॉकेल पिल्याने कोरोना मरतो. हा सल्ला ऐकून महेंद्रने रॉकेल प्राशन केले. यामुळे त्याची तब्येत आणखी बिघडली.
महेंद्रला त्याचे कुटुंबीय एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेवून गेले. यानंतर तिथून दुसरीकडे हलविण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. महेंद्रला कोरोना होता की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी घेतली. ती निगेटिव्ह आली.