हरियाणातील पानिपत येथील भारत नगरमध्ये जय नारायण नावाच्या व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जय नारायण यांच्या मुलांनी आरोप केला आहे की, त्यांचे वडील अरुण नावाच्या व्यक्तीजवळ बसून मद्यपान करत होते, त्यावेळी अरुणने वडिलांचा गळा पकडला आणि मारहाण करण्याची धमकी दिली. यानंतर वडील तणावात घरी आले आणि गच्चीवर गेले. तिथून खाली पडले. तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली, मात्र रुग्णवाहिका दीड ते दोन तास उशिरा पोहोचली.
रुग्णवाहिका उशीरा आल्यानंतर रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याचा आरोप मुलांनी केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वडिलांवर उपचार केले जात नव्हते. मुलांनी सांगितलं की, वडील सुमारे एक तास रुग्णवाहिकेत पडून होते, परंतु कोणीही उपचार केले नाहीत. फक्त डॉक्टर नाहीत असं म्हणत राहिले आणि काही वेळाने वडिलांना मृत घोषित केलं.
जयनारायण यांचा मुलगा भविष्य याने सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांचे वडील जिवंत होते. त्यांनी माझा हात धरून त्यांना वाचवण्यास सांगितले, मात्र कोणीही उपचार दिले नाहीत. आपण वडिलांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाऊ, असे तो तेथे उपस्थित लोकांना सांगत राहिला, परंतु कोणीही त्यांना जाऊ दिले नाही.
रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती आणि वडिलांना उपचार मिळाले असते तर आज ते जिवंत असते. वडिलांच्या निधनानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुलगा भविष्य आणि मुलगी नव्या यांना धक्का बसला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुलांचे नातेवाईक आणि शेजारी करत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.