इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेशोत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण मंडपात नाचताना हार्ट अटॅक असल्याचे सांगण्यात येत आहे. 26 वर्षीय तरुणाचं नाव प्रसाद असं आहे.
तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर 'तेलुगु स्क्राइब' हँडलसह शेअर करण्यात आला होता, जो काही वेळातच जोरदार व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आनंदाने नाचताना स्पष्ट दिसत आहे. अचानक तरुण नाचत असताना त्याचा तोल जातो आणि लोक बसलेल्या मागच्या बाजूला जमिनीवर पडतो.
तरुण ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच्याभोवती अनेक लोक जमतात. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसादला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वी देखील, एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गाझियाबादमधील एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना हार्ट अटॅकने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू कसा झाला हे दाखवण्यात आले होते. सरस्वती विहारमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेची सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.