काँग्रेसला मतदान केल्याने भावावरच गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 06:25 AM2019-05-16T06:25:46+5:302019-05-16T06:27:02+5:30
आपल्या भावाने भाजपला नव्हे, तर काँग्रेसला मतदान केल्यामुळे संतापलेल्या भाजपच्या समर्थकाने त्याच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार हरयाणामध्ये घडला.
झझ्झर (हरयाणा) : आपल्या भावाने भाजपला नव्हे, तर काँग्रेसला मतदान केल्यामुळे संतापलेल्या भाजपच्या समर्थकाने त्याच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार हरयाणामध्ये घडला. गोळीबार झालेल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईलाही भाजपच्या या समर्थकाने मारहाण केली. त्यात तीही जखमी झाली आहे.
हरयाणातील झझ्झर जिल्ह्याच्या सैलाना गावात हा प्रकार घडला. गोळीबार करणारा भाजपचा समर्थक फरार आहे. धर्मेंद्र असे त्याचे नाव आहे. राजा या भावाने भाजपला मतदान करावे, अशी धर्मेंद्र याची इच्छा होती. पण राजाने काँग्रेसला मतदान केले. हे कळल्याने धर्मेंद्र संतापला होता.
सैलाना गावात भाजपसमर्थक व काँग्रेससमर्थक यांच्यात १२ मे रोजी वादावादी झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र घरी गेला आणि त्याने राजावर गोळ्या झाडल्या. धर्मेंद्रला समजवायला गेलो असता, मलाही दुखापत झाली, असे आईचे म्हणणे आहे.
राजा व आई या दोघांना गावकरी व पोलिसांनी लगेचच रुग्णालयात दाखल केले. राजाची प्रकृती स्थिर आहे. आईवरही उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गोळीबाराची माहिती मिळताच आम्ही गावात पोहोचलो. पण तोपर्यंत आरोपी धर्मेंद्र गावातून पळून गेला होता. तो अद्याप फरार आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. त्याच्याकडे शस्त्राचा परवाना नाही. (वृत्तसंस्था)