गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. पंजाबमध्येही पावसाने हाहाकार माजवलाय. दरम्यान, एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. सतलज नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेला एक व्यक्ती थेट पाकिस्तानात पोहोचला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या कसूर जिल्ह्यातील गंडा सिंगवाला गावातील मूकबधिक व्यक्ती सतलजच्या पुरात वाहून गेला होता. सगळ्यांना वाटले की, त्याचा जीव वाचू शकणार नाही. पण, तो थेट पाकिस्तानात पोहोचला. लाहोरला पोहोचल्यानंतर त्याला वाचवण्यात आले. तो मूकबधिर असून, फक्त सांकेतिक भाषा बोलतो. बचाव केल्यानंतर त्याला गुप्तचर यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानातील बचाव पक्षकाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 50 वर्षीय भारतीय नागरिक मूकबधिर आहे आणि सांकेतिक भाषेतून संवाद साधतो. त्याच्या हातावर बनवलेला टॅटू पाहून तो व्यक्ती हिंदू असल्याची ओळख पटली. दरम्यान, लाहोर आणि पंजाबमधील कसूर जिल्ह्यातील गंडा सिंग वाला गावाचे अंतर सूमारे 70 किलोमीटर आहे. त्यामुळे इतक्या दूर तो व्यक्ती कसा पोहोचला, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.