पाटणा- वडिलांच्या जागी रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी मुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात घडली आहे. वडिलांना गोळी मारून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. तसंच दोन कॉन्ट्रॅक्ट किलरलाही अटक केली आहे.
आरोपी मुलाचे वडील ओम प्रकाश मंडल मंगळवारी बिहारमधील मुंगेल जिल्ह्यात असलेल्या ईस्ट कॉलनीतील ऑफिसर्स क्लब रोडवरील ऑफिसमध्ये असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. ओम प्रकाश मंडल यांच्या खांद्यावर गोळी लागली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या रवी रंजन (वय 31) अटक केली आहे. रवीच्या चौकशीनंतर पोलिसांना सुनील मंडल व ओम प्रकाश यांचा मुलगा पवन मंडलबद्दल समजलं व त्यांना अटक करण्यात आली.
ओम प्रकाश मंडल 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार होते. ईस्ट कॉलनी पोलीस स्टेशनचे एचएसओ मोहम्मद अली साबरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन काही वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता पण त्याला परीक्षेत यश मिळत नव्हतं. पवनचे वडील 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे वडिलांची नोकरी मिळावी यासाठी त्याने वडिलांच्याच हत्येचा कट रचला. पवनने दोन कॉन्ट्रॅक्ट किलरला 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. तसंच अर्धी रक्कम अगाऊ दिली होती.