नवी दिल्ली - एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला फोनवरुन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले, तरीही तिहेरी तलाकच्या घटना वारंवार समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील एटा येथून नुकतीच तिहेरी तलाकची घटना समोर आली आहे. माहेरहून सासरी पोहोचण्यासाठी पत्नीला केवळ 10 मिनिटे उशीर झाला म्हणून पतीनं तिला फोनवरुनच तलाक दिला. पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, 30 मिनिटांच्या आतमध्ये माहेरहून सासरी परत येण्याचे आश्वासन तिनं पतीला दिले होते. पण घरी पोहोचण्यास 10 मिनिटे उशीर झाल्यानं तिला पतीनं तलाक दिला.
महिलेनं सांगितले की, आजीला पाहण्यासाठी मी माहेरी गेले होते. अर्ध्या तासात घरी पोहोचण्याची तंबी पतीनं मला दिली होती. पण सासरी परतण्यास मला 10 मिनिटांचा विलंब झाला. यानंतर त्यानं माझ्या भावाच्या मोबाइल संपर्क साधला आणि तीन वेळा तलाक म्हटले. पतीच्या अशा वागण्यामुळे मी अतिशय तणावात आहे.
दरम्यान, पीडित महिलेनं सासरच्या मंडळींवरही आरोप केले आहेत. निकाहदरम्यान हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरची मंडळी मारहाण करायची. त्यांच्या मारहाणीमुळे माझा गर्भपातदेखील झाला आहे, असा गंभीर आरोप तिनं केला आहे.
माझे कुटुंब फार गरीब आहे. यामुळे माझ्या पतीला हुंडा देण्यास ते सक्षम नाहीत, असेही महिलेनं पोलिसांना सांगितले आहे. सरकारनं मला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मी आत्महत्या करेन, असा इशारा महिलेनं दिला आहे.
दरम्यान, एटाचे क्षेत्राधिकारी अजय भदौरिया यांनी महिलेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकरणाची चौकशी करुन आरोपींविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी महिलेला सांगितले.