पाटना: सरकारी नोकरी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असतं आणि यासाठी अनेक लोकं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. मात्र मोजक्याच लोकांना सरकारी नोकरी करण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे भारतातील अनेक खासगी कंपन्या बंद होत असल्याने अनेकांना नोकरी गमवावी लागते आहे. परंतु बिहारमध्ये गेल्या 30 वर्षापासून एकच व्यक्ती तीन वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
सध्या सरकारी नोकऱ्या तर दूरची गोष्ट असून खासगी क्षेत्रातील नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. परंतु बिहारमधील सुरेश राम नावाचा व्यक्ती गेल्या 30 वर्षापासून तीन वेगवेगळ्या सरकारी पदावर काम करत असल्याचे समोर आल्याने या व्यक्तीला तीन सरकारी नोकऱ्या मिळाल्याच कश्या असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सुरेश कुमार किशनगंजमध्ये बांधकाम विभाग कार्यालयात तसेच बांकामधील जलसंधारण विभागात आणि भीमनगर पूर्व येथील जलसंधारण सहाय्यक अभियंताच्या पदावर एकाचवेळी काम करत होता व त्याला या तिन्ही नोकऱ्यांचा वेगवेगळा पगारही घेत होता.
सुरेश रामला १९८८ साली पाटणा येथील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून पहिली नोकरी मिळाली. याचदरम्यान त्याला एका वर्षानंतर जलसंधारण विभागातील नोकरीचा प्रस्ताव आल्याने त्याने येथेही नोकरी स्विकारली. त्यानंतर तिसऱ्या नोकरीचे पत्रही त्याला जलसंधारण विभागाकडून आल्याने तो तिन्ही ठिकाणी सरकारी नोकऱ्या करत होता.
सरकारकडून पगाराचा हिशोब ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीएफएमएस या नव्या यंत्रणेमुळे सुरेश राम याचा खोटारडेपणा समोर आला. तसेच हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर सुरेश कुमार फरार झाला आहे. मात्र या प्रकरणी त्याच्यावर तिन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.