शिमला : हिमाचल प्रदेशच्या परिवहन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तब्बल 13 वर्षांपासून एकही सुट्टी घेतलेली नाही. हिमाचल प्रदेश परिवहन निगममध्ये सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव जोगिंदर सिंह असं आहे. जोगिंदर हिमाचल प्रदेश परिवहन विभागात वाहक म्हणून काम करतात. या सेवेबद्दल सिरसोर कला संगम नावाची एक संस्था जोगिंदर यांचा सन्मान करणार आहे. जोगिंदर सिंह यांच्या अखंड सेवेचा 28 जून रोजी सन्मान करण्यात येणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, जोगिंदर सन्मान सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत. त्यांनी याबद्दलची माहिती संस्थेला दिली आहे. सन्मान सोहळ्याला उपस्थित राहायचं असल्यास सुट्टी घ्यावी लागेल, म्हणून जोगिंदर या सोहळ्याला जाणार नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे वडिल पुरस्कार स्वीकारणार आहेत. 'डॉ. यशवंत सिंह परमार पुरस्कार स्वीकारण्यासाठी माझे वडील जातील,' अशी माहिती जोगिंदर यांनी दिली. जोगिंदर सिंह यांनी 4 जून 2005 पासून हिमाचल प्रदेशच्या परिवहन विभागात नोकरी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. जोगिंदर सणांच्या दिवशीही त्यांचं कर्तव्य बजावतात. रविवारी मिळणारी सुट्टीदेखील त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात 303 सुट्ट्या जमा झाल्या आहेत. त्यांनी या सर्व सुट्ट्या हिमाचल प्रदेश परिवहन विभागाला परत केल्या आहेत. त्यांच्या या सेवेचा परिवहन विभागानं 2011 मध्ये सन्मान केला होता.
तब्बल 13 वर्ष सुट्टीविना काम; अखंड सेवेचा होणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:23 AM