फर्रुखाबाद: मुलीच्या वाढदिवसानिमित्त आसपासच्या लहान मुलांना बोलावून त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात घडली आहे. गुन्हेगारानं त्याच्या घरात 20 मुलांना आणि काही महिलांना ओलीस ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपीनं दरवाज्याच्या मागून बॉम्बफेक करुन गोळीबारही केला. यामध्ये एक ग्रामस्थ जखमी झाला आहे. आरोपीनं बॉम्बफेक केल्यानं एक भिंत कोसळली. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांच्या आणि महिलांच्या सुटकेसाठी दहशतवादविरोधी पथकाच्या कमांडोंना बोलावण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. घरात लपलेला आरोपी वारंवार आमदार आणि अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र आरोपीनं कुठलीही मागणी केली नसल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. सुभाष बाथम असं आरोपीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वी काकांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात त्याला तुरुंगवास झाला. मात्र वर्षभरापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्याला एक दहा वर्षांची मुलगी आहे. सुभाषनं दुपारी मुलीच्या वाढदिवसाच्या बहाण्यानं गावातल्या लहान मुलांना घरात बोलावलं. आसपास राहणारी मुलं अडीचच्या सुमारास सुभाषच्या घरी पोहोचली. यानंतर सुभाषनं घराचा दरवाजा लावून घेतला. संध्याकाळी ४.३० वाजता एक महिला तिच्या मुलाला नेण्यासाठी सुभाषच्या घरी पोहोचली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं तिला समजलं. तिनं लगेचच याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. मात्र अद्याप पोलिसांना मुलांची सुटका करता आलेली नाही. सुभाष घरातून वारंवार बॉम्बफेक करत आहे. याशिवाय सतत देशी कट्ट्यानं गोळीबारदेखील करत आहे. त्यामुळे पोलिसांना ओलिसांची सुटका करण्यात अडचणी येत आहेत.