नवी दिल्ली- राजीव चौक मेट्रो स्टेशनवरी बर्गर किंगमधून बर्गर विकत घेणं एका तरुणाला महागात पडलं आहे. बर्गरमध्ये प्लॅस्टिकचा तुकडा आढळल्याची घटना तेथे घडली. बर्गरमध्ये आलेलं ते प्लॅस्टिक चुकून गिळल्याने तरुणाच्या घश्यात दुखापत झाली आहे. त्यामुळे तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मुलाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिफ्ट मॅनेजरला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश कुमार नावाच्या व्यक्तीने रविवारी बर्गर किंगमधून चीज वेज बर्गर खरेदी केलं. बर्गर खाताना बर्गरमध्ये काही कडक पदार्थ असल्याचं त्याला जाणवलं. त्यानंतर त्याला मळमळ व्हायला लागली. त्रास व्हायला लागल्यावर त्याने याबद्दल बर्गर किंगचा मॅनेजर व पोलिसांना याबद्दलची माहिती दिल्यावर त्या तरुणाला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
पोलिसांच्या माहितीनुसार बर्गमध्ये एक प्लॅस्टिकचा तुकडा होता. ज्यामुळे राकेश कुमारच्या अन्ननलिकेला दुखापत झाली. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बर्गर किंग व त्याच्या मॅनेजरविरोधात तक्रार दाखल करून अटक केली पण नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.